ठाणे - ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातील पूर्णिमा संजीव गुळींग या महिला पोलीस अंमलदाराच्या प्रामाणिकपणामुळे प्रतिभा पाटील या महिला वकिलाला तिचे गहाळ झालेले मंगळसूत्र सुखरुप मिळाले. ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रणवरे यांच्या हस्ते त्यांना ते सुपूर्द करण्यात आले. शिवाय, प्रामाणिकपणे ते पोलीस ठाण्यात देणाऱ्या पोलीस अंमलदार गुळींग यांचाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रणवरे यांनी बुधवारी विशेष सत्कार केला.
ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलीस नाईक पूर्णिमा गुळींग या २० फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील जांभळी नाका परिसरातून जात होत्या. त्यावेळी त्यांना १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र रस्त्यावर पडलेले आढळले. पूर्णिमा यांनी हा ऐवज ठाणोनगर पोलीस ठाण्यात जमा केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रणवरे आणि निरीक्षक विद्या पाटील यांनी या मंगळसूत्रच्या मालकीणीचा शोध घेतला असता, एक महिला तिचे हरवलेले मंगळसूत्र बाजारपेठेत शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिला शोधून तिचा हा ऐवज रणवरे यांच्या हस्ते परत केला.
हे मंगळसूत्र प्रतिभा पाटील या वकिल महिलेचे असल्याची माहिती समोर आली. आपला हरवलेला दागिना परत मिळाल्याने अॅड. पाटील यांनी पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, प्रामाणिकपणे ऐवज परत करणाऱ्या महिला पोलीस नाईक पूर्णिमा यांचा ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवरे आणि विद्या पाटील यांनी सत्कार करुन त्यांचे कौतुक केले.