जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून कासमवाडी व रचना कॉलनीत दोन कुटुंबात बदला घेण्याची आग उफाळून येत असून सलग तीन दिवसांपासून एकमेकांवर शस्त्राने व घरांवर हल्ले होऊ लागले आहेत. याच हल्ल्याच्या भीतीने घराला कुलूप लावून काकांकडे आसरा घेतलेल्या आशा गोपाळ चौधरी (रा.रचना कॉलनी) यांच्या घरावर मध्यरात्री अडीच वाजता टोळक्याने हल्ला चढविला. त्यात एक लाख रुपये रोख व दागिने असा एकूण २ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवजही लुटून नेला. सुनील रसाल राठोड, संजय रसाल राठोड (दोघे रा.कासमवाडी), विशाल पद्मसिंग परदेशी (रा.कुसुबा) व रुपेश संजय सपकाळे (रा.कांचन नगर) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
दसऱ्याला झालेल्या भांडणाच्या कारणावरून सोनू गोपाळ चौधरी याने त्यांच्या साथीदारांना सोबत घेऊन अनिल राठोड याच्यावर १४ मार्च रोजी दुपारी १ वाजता कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर सोनू चौधरी याची काकू ललिता सुनील चौधरी घाबरुन कासमवाडीतील घर बंद करून नातेवाईकांकडे निघून गेली होती. तेव्हा दुपारी एका टोळक्याने त्यांच्या बंद घरावर हल्ला चढवून कपाट, फ्रीज फोडले होते. या दोन्ही घटनांबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हे दाखल झाले होते.
ही धग कायम असल्याने घरावर हल्ला होण्याच्या भीतीने सोनू चौधरीची आई आशा गोपाळ चौधरी यांनी घराला कुलूप लावून काका प्रभाकर जगन्नाथ चौधरी यांच्याकडे आसरा घेतला. पती देखील काही दिवसांपासून बाहेरगावी आहेत. अशातच १५ रोजी मध्यरात्री अडीच वाजता आशा चौधरी यांच्या घरावर हल्ला झाला. त्यात संपूर्ण घराची नासधूस केली. एक लाख रुपये रोख, ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेण्यासह इतर साहित्यांची नासधूस करण्यात आली. याबाबत तिसरा गुन्हा बुधवारी दाखल झाला.