चिखली (जि. बुलढाणा) : पोलीस दलात कार्यरत पत्नी व पोटच्या दीड वर्षांच्या चिमुकलीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्यानंतर पतीने देखील गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात ही घटना घडली. वर्षा किशोर कुटे (माहेर चे नाव दांदाले), दीड वर्षांची मुलगी कृष्णा किशोर कुटे आणि किशोर कुटे अशी मृतांची नावे आहेत. नेमक्या कोणत्या कारणाने हे कुटुंब संपवण्यात आले याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.
या दुर्देवी घटनेतील मृतक महिला वर्षा किशोर कुटे ह्या पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या चिखली पोलीस स्टेशनला त्या कार्यरत होत्या. तर त्यांचे पती किशोर कुटे हे शेती करायचे. या दाम्पत्याला एक आठ वर्षांची व एक दीड वर्षांची अश्या दोन मुली होत्या. मृत महिला २१ ऑगस्ट रोजी कर्तव्यावरून घरी परतल्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांचे पती किशोर कुटे यांनी कांदा कापण्याच्या धारदार शस्त्राने त्यांची गळा चिरून हत्या केली. सोबतच अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीचीही अत्यंत निर्घूणपणे गळा चिरून हत्या केली आहे. दरम्यान पत्नीसह चिमुकलीला संपविल्यानंतर किशोर कुटे याने शहरापासून जवळच असलेल्या गांगलगाव शिवारात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रूग्णालयात हलविले आहे. नागपंचमीच्या दिवशी झालेल्या या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दैव बलवत्तर म्हणून आठ वर्षाची चमुकली बचावली
या घटनेतील मृतक पती, पत्नीला दोन मुली होत्या. यापैकी आठ वर्षांची चिमुकली शाळेत गेलेली होती. सुदैवाने नेमक्या याचवेळी ही क्रुर घटना घडली आहे. अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकल्या जिवाचीही पर्वा न करता तिच्या पित्याने तिलाही संपविले आहे.