मुंबई : लग्नापूर्वीच्या अफेअरची कबुली पत्नीला देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने कस्तुरबा पोलिसात धाव घेतल्यावर पत्नी आणि सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पूर्वेतील कार्टर क्रॉसरोड क्रमांक ३ येथे पीडित राहतो. पीडित एका नामांकित कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करतो. त्याची पत्नी आयुर्विमा कंपनीत व्यवस्थापक आहे. जानेवारीमध्ये त्यांचे लग्न झाले. पत्नीने पीडिताला लग्नापूर्वी असलेल्या प्रेमसंबंधांबद्दल विचारले होते. तेव्हा पतीने एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. महाबळेश्वरला हनिमूनला गेला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याच्या मोबाइलमधून व्हॉट्सॲप चॅटचा बॅकअप डेटा व फोटो काढला. त्यानंतर तेच फोटो त्याला दाखवून ती भांडू लागल्याचा पतीचा आरोप आहे. त्यानंतर ३ ऑक्टोबरला तिने संपूर्ण चॅट आणि फोटो तिच्या वडिलांच्या व्हॉट्सॲपवर पाठवले. आता त्याच्या सासऱ्यांनी त्याला व्हॉट्सॲपवर धमकी दिली होती की तो व्हॉट्सॲप चॅटचे बॅनर बनवेल व गेटवर त्याच्या राहत्या इमारतीच्या बाहेर लावेल. त्यामुळे पीडित घाबरला आणि बदनामीच्या भीतीने त्याने पोलिसांकडे मदत मागत तक्रार दाखल केली.