जमशेदपूर - शहरात एका व्यापाऱ्याच्या पत्नीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत कारमधून जाताना पत्नीला गोळी मारण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले. मात्र आता तपासात ज्या गोष्टी समोर येतायेत हे पाहून पोलिसही हैराण झालेत. तपासात एका खूनासाठी ३ सुपारी दिल्याचं पुढे आले आहे. यातील तिसरी सुपारी देणाऱ्या व्यक्तीचं सत्य जेव्हा उघड झाले तेव्हा प्रत्येक जण अचंबित झाला. २८ मार्चच्या रात्री १० वाजता जमशेदपूरपासून १७ किमी अंतरावर हायवेवर ही गोळीबाराची घटना घडली.
एक कुटुंब कारमधून घरी परतत होते. कारमध्ये पती-पत्नी आणि २ मुले होती. मात्र रस्त्यातच अचानक कारवर गोळी चालवण्यात आली. ही गोळी व्यापाऱ्याची पत्नी ३९ वर्षीय ज्योतीला लागली. रात्रीच्या अंधारात झालेल्या या हल्ल्याने सर्वच घाबरले. त्याच अवस्थेत पतीने जखमी पत्नीला हॉस्पिटलला नेले. पण तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अखेर ज्योतीवर गोळी कोणी झाडली, तिला मारण्याचा प्रयत्न कुणी केला हे प्रश्न उपस्थित झाले. मागील काही दिवसांपासून व्यापाऱ्याला खंडणीसाठी फोन येत होते. ज्योतीच्या हत्येमागे त्यांचाच हात आहे असा संशय व्यापाऱ्याने पोलिसांकडे व्यक्त केला. खंडणीबाबत स्वत: व्यापाऱ्याने पोलिसांना तक्रार दिली होती. ज्या रात्री ही घटना घडली तेव्हा व्यापारी पत्नीसह रेस्टॉरंटमधून डिनर करून घरी जात होते. मात्र रस्त्यात त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी गाडी थांबवली आणि त्याचवेळी मारेकऱ्यांनी ज्योतीवर गोळ्या झाडल्या.
व्यापाऱ्याकडे खंडणीखोरांनी २५ लाखांची मागणी केली होती. पतीने सांगितले की, हल्लेखोर कसे आले, त्यांनी गोळी चालवल्यानंतर पसार झाले हे कळाले नाही. ते कुठल्या वाहनाने आले हेदेखील गडबडीत पाहिले नाही असं व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितले. मात्र ज्योतीच्या घरच्यांनी वेगळाच संशय व्यक्त केला. ते व्यापारी जावयावर नाराज होते. याआधीही व्यापाऱ्याने गळा दाबून त्यांची मुलगी म्हणजे ज्योतीला मारण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते असा दावा व्यापाऱ्याच्या सासरच्यांनी केला. सासरच्यांचा दावा, व्यापाऱ्याचा जबाब यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. तेव्हा तपासात व्यापारी रवी अग्रवालबाबत नवी माहिती पुढे आली. या प्रकरणात खंडणी नव्हे तर पतीनेच पत्नी ज्योतीचा हत्येचा कट रचला. त्यासाठी मारेकऱ्यांना १६ लाख रुपये सुपारी दिली होती. सुपारी देऊन पतीने शहराबाहेर पत्नीला नेले, तिथे रस्त्यात गाडी उभी केली तेव्हा ज्योतीवर हल्ला झाला.
दरम्यान, सध्या पोलिसांनी या प्रकरणी आरोपी व्यापारी पती रवी, त्याचा ड्रायव्हर मुकेश मिश्रा, २ शूटर यांना अटक केली आहे. रवीने याआधीही पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला होता. या खळबळजनक बातमीनं व्यापारी रवी अग्रवालचा चेहरा सर्वांसमोर उघड झाला.