लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक बाब गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघडकीस आली आहे. कमलकांत कपूरचंद शहा (वय ४६) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातून ही बाब समोर आली आहे. जेवणातून विष देत त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट होताच त्यांची पत्नी कविता ऊर्फ काजल (४५) आणि प्रियकर हितेश शांतीलाल जैन (४६) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
सांताक्रूझ येथील रहिवासी असलेले कमलकांत शहा हे ३ ते १९ सप्टेंबरदरम्यान बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांची रक्ताची हेवी मेटल टेस्ट केली. त्या रक्त चाचणीमध्ये कमलकांत यांच्या रक्तात ‘आर्सेनिक’ व ‘थेलीयम’ हा धातू सामान्य पातळीपेक्षा अत्याधिक प्रमाणात आढळून आला. त्यामुळे त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी आझाद मैदान पोलिस ठाण्याला कळवले. त्यानुसार, आझाद मैदान पोलिसांनी २० सप्टेंबर रोजी अपमृत्यूची नोंद करून पुढील चौकशीसाठी हा गुन्हा सांताक्रूझ पोलिसांकडे वर्ग केला.
अन्नातून निघाले विषारी धातूयाप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.तपासात, पत्नी कविताने प्रियकर जैनसोबत योजनाबद्ध कट रचून कमलकांत यांना आर्सेनिक व थेलीयम हे विषारी धातू खाण्या-पिण्यातून देऊन मृत्यू घडवून आणल्याचे समोर आले. त्यानुसार, दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना हत्येसाठीची माहिती कुठून व कशी मिळाली? किती दिवसांपासून ते अशाप्रकारे खाण्या-पिण्यातून विषप्रयोग करत होते? याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.