सासरच्यांनी सुनेला गच्चीवरून फेकलं, वडिलांना बोलावून सांगितलं; लवकर या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 05:11 PM2022-06-18T17:11:51+5:302022-06-18T17:17:00+5:30
Attempt to Murder : सध्या मुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली : राजधानीच्या मयूर विहारमध्ये सासरच्या लोकांनी सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या हेल्पलाइन 181 वर कॉल केल्यावर मुलीच्या भावाने सांगितले की, तिच्या 30 वर्षीय बहिणीला तिच्या सासरच्या लोकांनी पहाटे 3 वाजता टेरेसवरून खाली ढकलले. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या मुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाची दखल घेत दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली असून एफआयआर नोंदवण्यास सांगितले आहे. आयोगाला माहिती देताना मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांना मुलीच्या सासरकडून फोन आला आणि त्यांना सांगण्यात आले की, त्यांची मुलगी जिन्यांवरून पडली आहे आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेव्हा ते त्यांच्या मुलीच्या सासरच्या घरी पोहोचले तेव्हा शेजाऱ्यांनी सांगितले की, पहाटे 3 च्या सुमारास त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांच्या मुलीला गच्चीवरून फेकून दिले. मुलीच्या वडिलांनी आयोगाला सांगितले की, मुलीचे लग्न होऊन गेल्या तीन वर्षांपासून सासरचे लोक तिचा छळ करत होते.
आयोगाकडून सांगण्यात आले की, मुलीच्या भावाने हॉस्पिटलमधून आयोगाला एक व्हिडिओही पाठवला आहे, ज्यामध्ये ती सांगत आहे की, तिला सासरच्या लोकांनी गच्चीवरून खाली फेकले आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. त्याचबरोबर आयोगाने पोलिसांना एफआयआर नोंदवण्यासोबतच दंडाधिकाऱ्यांसमोर मुलीचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. यासोबतच या प्रकरणातील आरोपींच्या अटकेचीही मागणी करण्यात आली आहे. आरोपींना अटक झाली नाही, त्याचे कारणही विचारण्यात आले आहे. सोबतच या संपूर्ण प्रकरणाचा कार्यवाही अहवाल २० जूनपर्यंत मागविण्यात आला आहे.
दिल्ली के मयूर विहार में 30 साल की महिला को सुबह 3 बजे उसके ससुराल वालों ने छत से फेंका। उसके भाई ने 181 पे कॉल कर हमको ये विडीओ भेजी है। लड़की की हालत बहुत नाज़ुक है। मैं दिल्ली पुलिस को नोटिस इशू कर रही हूँ FIR दर्ज करने, अरेस्ट करने और MM के सामने लड़की के बयान करवाने के लिए! pic.twitter.com/XuX6kdsfJf
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) June 18, 2022
यासंदर्भात आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची गंभीर तक्रार प्राप्त झाली आहे. एक 30 वर्षीय तरुणी रुग्णालयात जीवन-मरणाची झुंज देत आहे. पोलिसांना नोटीस पाठवली आहे. मुलीचा जबाब तातडीने नोंदवून याप्रकरणी कठोर पावले उचलावीत.