मुंबई : सासरच्या मंडळींनी लेकीचा छळ करून तिची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी अंधेरी पोलिस ठाण्यात केला आहे. याप्रकरणी पतीसह त्याच्या कुटुंबीयांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.तक्रारदार भारत जोशी (५०) हे मूळचे पालघरचे राहणारे असून त्यांची मुलगी सुस्मिता हिचे लग्न अंधेरीत राहणाऱ्या तरुणासोबत २७ डिसेंबर, २०२० रोजी झाले. त्यापूर्वी साखरपुड्यात जोशी यांनी तिच्या पतीला रितीरिवाजाप्रमाणे सोन्याची अंगठी घातली व लग्नातही ऐपतीप्रमाणे दागदागिने दिले होते. तसेच लग्नाचा खर्चही वर-वधूने अर्धा अर्धा वाटून घेतला. अंधेरीच्या एका सोसायटीमध्ये मुलगी पतीसह राहत होती. मात्र, त्यानंतर तिचा छळ करण्यास कुटुंबीयांनी सुरुवात केली असा जोशी यांचा आरोप आहे. आठ दिवसांतच मुलीला माहेरपणासाठी आणल्यानंतर सासरची मंडळी नीट वागणूक देत नसल्याची तिने तक्रार पालकांकडे केली. तसेच, तुझ्या बापाने भीक मागून लग्न केले असेही टोमणे तिला ऐकवले जात असल्याचा आरोप आहे.
तिला तिचा मोबाइल वापरायला देत नव्हते तसेच नवविवाहित पती-पत्नीला एकत्र झोपण्याचीही परवानगी नव्हती असेही जबाबात म्हटले आहे. रात्री बारा वाजता कपडे धुवायला सांगायचे, स्वयंपाक घरात झोपवायचे, मारहाण करायचे असे प्रकार सतत सुरू होते. अखेर २० जानेवारी रोजी सुस्मिताच्या सासऱ्यांनी फोन करून तुमची मुलगी मेली आहे असे जोशी यांना कळविले. त्यांनी तातडीने अंधेरीच्या क्रिटिकेअर रुग्णालयात धाव घेतली तेव्हा त्यांनी मृत मुलीला पाहिले. सासरच्या मंडळींनी छळ करून तिचा जीव घेतल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. आम्ही याप्रकरणी कोर्टाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल केला आहे.