अमरावती : इन्स्टाग्रामवर ‘मौका सभी को मिलता है, आज मारोगे तो कल मारे जाओगे’ व लवकर भेटू अर्जुननगरवालो’ अशी पोस्ट शेअर करून डझनभर तरुणाईने नंग्या तलवारी हवेत भिरकावत गरबास्थळी धुडगूस घातला. विशेष म्हणजे त्यापैकी चार ते पाच मुले ही अल्पवयीन आहेत. स्थानिकांनी एकजुटीने तो हल्ल्याचा प्रयत्न परतवून लावला. गाडगेनगर पोलिसांनी चार ते पाच तरुणांना ताब्यात घेतले. अर्जुननगरात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
अर्जुननगरातील श्री जयदुर्गा उत्सव मंडळाने नवरात्रोत्सवादरम्यान गरबा आयोजित केला होता. शुक्रवारी ज्या मुलांनी गरबा मंडपात धुडगूस घातला. त्यापैकी काही तरुण चार- पाच दिवसांपूर्वी त्या गरब्यात सहभागी झाले होते. मात्र, ते गरब्यादरम्यान मुलींची छेड काढत असल्याच्या तक्रारी काहींनी केल्या. मंडळ कार्यकत्यांनी आधार कार्ड तपासले असता ते अर्जुननगर परिसरातील रहिवासी आढळून आले नाहीत. त्यामुळे गरबा आयोजकांनी त्यांना मज्जाव करत तेथून हाकलून दिले. त्यावेळी तूतू- मैमैदेखील झाली. त्याचा वचपा काढण्यासाठी ‘बॅडबॉय’ असे अकाउंट असलेल्या एकाने इन्स्टाग्रामवर अर्जुननगरवासियांना धमकी देणारी पोस्ट टाकली.
सायकल फेकल्याने लागली चाहूल
ज्यांना गरबा मंडपातून हाकलून देण्यात आले, ते दहा ते बाराजण शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अर्जुननगरात पोहोचले. तेथे त्यांनी एका मुलाची सायकल हिसकावून ती फेकून दिली. शुक्रवारी तेथे भंडारा असल्याने मंडळाचे अनेक कार्यकर्ते हजर होते. त्यांना त्याच तरुणांनी सायकल फेकल्याचे समजताच मंडळाचे अध्यक्ष मनीष बोडखे यांना घटनेची चाहूल लागली. त्यांनी ११२ वर कॉल करून माहिती दिली. दरम्यान, १० ते १२ जण हाती तलवारी घेऊन गरबास्थळी पोहोचले. तेथे त्यांनी मंडळाच्या कार्यकत्यांशी प्रचंड वाद घातला. थोडी मारामारीदेखील झाली. दरम्यान, एसीपी पुनम पाटील व ठाणेदार आसाराम चोरमले तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले. तर सात ते आठ जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या.