माजलगाव: मोटारसायकल घेऊन न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलाने जन्मदात्या पित्याची भरझोपेत डोक्यात खोरे मारून हत्या केली. ही घटना २ फेब्रुवारीला तालुक्यातील टाकरवण येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून ग्रामीण पोलिसांनी निर्दयी मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मारोती लक्ष्मण भुंबे (वय ६५, रा. टाकरवण) असे मृत वडिलाचे नाव आहे. बालू उर्फ लक्ष्मण मारोती भुंबे ( वय ३१) या आरोपी मुलाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. मयत मारोती भुंबे यांची मुलगी विद्या लक्ष्मण गाडेकर ही टाकरवणमध्ये त्यांच्या शेजारीच राहते. तिच्या फिर्यादीनुसार, लक्ष्मण भुंबे याने वडिलांकडे मोटारसायकल हवी म्हणून तगादा लावला होता. २ रोजीच्या पहाटे ४ वाजता साखर झोपेत असलेल्या
वडिलांवर त्याने खोऱ्याने डोक्यात वार केले. यावेळी त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. घाबरून सर्वांनी खोली बंद केली. यावेळी विद्या यांचे पती लक्ष्मण गाडेकर यांनी बाहेर जाऊन पाहिले तेव्हा लक्ष्मण भुंबे हा वडिलांवर खोऱ्याने हल्ला करत असल्याचे दिसून आले. रक्तस्त्राव होऊन ते जागीच गतप्राण झाले त्यानंतर जखमी अवस्थेतील वडिलांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
पोलिस निरीक्षक बालक कोळी, सहायक निरीक्षक योगेश खटकळ, उपनिरीक्षक सचिन दाभाडे, हवालदार व्ही. बी. खराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी लक्ष्मण भुंबे यास ताब्यात घेतले. विद्या लक्ष्मण गाडेकर यांच्या फिर्यादीवरून बालू उर्फ लक्ष्मण भुंबेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक योगेश खटकळ हे करत आहेत.
गायीवर हल्ला करून आठ दिवस गायब
आठ दिवसांपूर्वी लक्ष्मण भुंबे याने रागाच्या भरात गायीला खोरे मारून घरातून निघून गेला होता. आठ दिवस तो घराबाहेरच भटकत होता. वडिलांनी त्यास १ फेब्रुवारीला शोधून घरी आणले. मात्र, त्याने त्यांनाच संपविले.
आरोपी मनोरुग्ण?
आरोपी लक्ष्मण भुंबे हा मनोरुग्ण असल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. तो सतत वडिलांना दुचाकी घेऊन द्या, असा हद्द धरायचा. मानसिक अस्थिरतेतून त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज आहे.