अझहर शेख, नाशिक: शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धारधार शस्त्रांचा धाक दाखवून सतत सर्वसामान्य नागरिकांना धमकावत एकापाठोपाठ एक गुन्हे करणारा सराईत गुंड संशयित सचिन उर्फ घोड्या तोरवणे (२७, रा. गणेशवाटिका रो-हाऊस, जेलरोड) याला पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, दरोडा, शस्त्र बाळगणे, दंगल माजविणे, जबरी चोरी, विनयभंग, जमाव जमवून मारहाण करत परिसरात दहशत पसरविणे असे विविध स्वरूपाचे गुन्हे संशयित सचिन तोरवणे याच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसावा आणि परिसरातील कायदा, सुव्यवस्था राखली जावी, यासाठी एम. पी. डी. ए. कायद्यांतर्गत पुन्हा वर्षभरासाठी मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले आहे. यापूर्वीही तोरवणे याला ८ ऑगस्ट २०१९पासून वर्षभर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून शिक्षा भोगून आल्यानंतरसुद्धा त्याने पुन्हा उपनगर पोलिस ठाणे हद्दीत ‘पहिले पाढे पंचावन्न’ या वाक्प्रचाराप्रमाणे गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवले. पोलिसांनी त्याला वारंवार समज देत कारवाईसुद्धा केली. मात्र, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने अखेर आयुक्त अंकुश शिंदे यांनी पुन्हा गुरुवारी (दि. १८) सचिन उर्फ घोड्या याला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. दोन आठवड्यांपूर्वी शिंदे यांनी सराईत गुन्हेगार संशयित गणेश उर्फ छकुल्या मधुकर वाघमारे याच्याविरुद्ध वर्षभराकरिताची स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.