- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई: मूळचे वाहनचालक असलेले गोरखनाथ सीताराम घनघाव (वय ५०,रा. चनई ता. अंबाजोगाई) दोन महिन्यांपूर्वी गावगाड्याच्या राजकारणात उतरले. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून गेल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर त्यांनी नवी बुलेट खरेदी केली; पण नियतीच्या मनात काही औरच होते. गावात झालेल्या वादात त्यांच्यावर शस्त्राने सपासप वार झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ५ ऑक्टोबर रोजीखुनाच्या या थरारक घटनेने चनई हादरली.
गोरखनाथ सीताराम घनघाव यांनी दोन महिन्यांपूर्वी चनई ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब अजमावले. नशिबाने त्यांना साथ दिली आणि सदस्य म्हणून ते निवडून आले होते. दुपारी चार वाजता गावात रेशनवाटपावरून वाद झाला. याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी आठ ते दहा जणांचा जमाव गोरखनाथ यांच्या घराच्या दिशेने चालून आला. यावेळी शिवीगाळ करत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले. मध्यस्थीसाठी आलेला एक जखमी झाला आहे. दोघांना तातडीने स्वाराती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गोरखनाथ घनघाव यांचा मृत्यू झाला. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात तणाव, पाच संशयित ताब्यात
या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.