मुंबई : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येपूर्वी आरोपी त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते. घटनेच्या दिवशी आरोपी काही कामानिमित्त सिद्दिकी यांच्या कार्यालयातही एक-ते दोन वेळा जाऊन आल्याचे समजते. वांद्रे येथील कार्यालयातून बाहेर पडताच शिवकुमार गौतमने अचानक फटाक्यांच्या आवाजात गोळ्या झाडून सिद्दिकी यांची हत्या केली.
घटनेच्या दिवशी शिवकुमार गौतम, गुरुमेल सिंग आणि स्वत: ला अल्पवयीन सांगणारा आरोपी ठरल्याप्रमाणे घटनास्थळी गेले. जवळपास तासभर घुटमळले. साडेनऊच्या सुमारास सिद्दिकी बाहेर पडताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हीच संधी साधून अंगरक्षक सोबत असतानाही शिवकुमारने सिद्दिकी वर सहा गोळ्या झाडल्या.
एक जण गार्डनमध्ये लपला आणि...गोळीबाराच्या घटनेनंतर एकाच्या घटनास्थळावरून मुसक्या आवळल्या, तर दुसरा साथीदार येथील एका गार्डनमध्ये लपला आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गार्डनमधून शोधून त्यास बाहेर काढले. यावेळी जमावाने दोन्ही आरोपींना चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
२८ काडतुसे जप्त...सिद्दीकी हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींकडून २८ काडतुसे, दोन पिस्तूल मॅग्झीनसह, एक मॅग्झीन, चार मोबाइल फोन, दोन आधार कार्ड आणि एक निळ्या रंगाची बॅग जप्त करण्यात आली आहे. आरोपींकडे डोळ्यात मारण्यासाठी स्प्रेदेखील होता,अशी माहिती सूत्रांनी दिली.