खामगाव (बुलढाणा) : आंतरजातीय प्रेमविवाहाच्या वादातून तालुक्यातील पारखेड येथे मुलासह कुटुबीयांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रविवारी दुपारी १२ जणांवर खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्याचवेळी दुसऱ्या गटानेही रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीनुसार मुलाच्या कुटुंबातील १४ जणांवर भादंविच्या विविध कलमांसह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पारखेड येथील संतोषी कैलास डाबेराव (२७) या महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये महिलेची मामेबहीण दिव्या हिने गावातील युवकासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला. याबाबत महिलेसह तिची मामेबहीण प्रिया या दोघींनी मुलीच्या सासरच्या घरासमोर जाऊन तिला गावात का आली, अशी विचारणा केली. त्यावेळी घरातील वैभव श्रीपाद आणेकर याने महिलेसह तिची मामेबहीण प्रियाला ओढाताण करून लोटपाट केल्याचे म्हटले.
तसेच पारखेड येथीलच मकरंद आणेकर, अरुण जोशी, मुकुंदा आनेकर, बालू आनेकर, चारुदत्ता आणेकर, श्रीपाद आनेकर, वनिता आणेकर, उज्ज्वला आणेकर, शारदा आणेकर, प्रतिभा आणेकर, मिलिंद आणेकर व दोन अनोळखी महिलांनीही ओढाताण करून लोटपाट केल्याचे नमूद आहे. तक्रारीवरून पोलिसांनी १४ आरोपींवर भादंविच्या कलम १४३,१४६,१४७,१४९, ३५४, ३२३, २९४, ५०४, सहकलम अ.जा. अ.ज. अ. प्र. अधिनियम कलमातील विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे करीत आहेत.