लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तीस वर्षांपूर्वी बंगल्यात चोरी करण्यासाठी गेलेल्या आणि बंगल्यातील दाम्पत्याची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या अविनाश पवार (४९) या प्रमुख आरोपीला शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे पकडले आहे. लोणावळ्याच्या सत्यम सोसायटीतील यशोदा बंगल्यात पवार आणि त्याचे दोन साथीदार अमोल काळे व विजय देसाई यांनी ४ ऑक्टोबर १९९३ रोजी धनराज ठाकरसी कुरवा (५५) व त्यांच्या पत्नी धनलक्ष्मी (५०) यांची दोरीने गळा आवळून नंतर धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती. यातील काळे व देसाई या दोघांना त्यावेळी लोणावळा पोलिसांनी अटक केली होती. मात्र पवार फरार होता.
गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे प्रभारी पोलिस निरीक्षक दयानंद नायक यांना खबऱ्यांमार्फत पवारबाबत टीप मिळाली होती की अविनाश पवार जो स्वतःचे नाव, ओळख लपवून समाजात वावरत होता. नायक यांच्या पथकाने विक्रोळी पूर्वच्या टागोर नगरमधून त्याला पकडले.
इतके वर्षे कुठे होता आरोपी?
अविनाश पवारने हत्या केल्यानंतर त्याच्या अन्य साथीदारांसह तो दोन दिवस शिर्डीला व त्यानंतर पुन्हा दोन दिवसांसाठी तो लोणावळ्याला आला. तेथून तो दिल्लीला जाऊन वर्षभर हॉटेलमध्ये काम करत होता. त्यानंतर १९९५ मध्ये तो कसारा परिसरात येऊन १९९६ पर्यंत त्याने गॅरेजमध्ये काम केले. पुढे १९९७ ते १९९८ मध्ये अहमदनगर येथे ड्रायव्हिंग व हॉटेलमध्ये काम केले. १९९९ मध्ये त्याने विक्रोळीतील प्रमिला हिच्याशी प्रेमविवाह केला.