- मंगेश कराळे
नालासोपारा: मध्य प्रदेशातील सतना येथे ६ मार्चला दिवसा ढवळ्या वाईन शॉपच्या व्यवस्थापकावर गोळ्या घालून त्याची हत्या करत २२ लाख रुपये लुटणाऱ्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपीला नालासोपाऱ्यातून पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने सोमवारी संध्याकाळी ताब्यात घेऊन एमपी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश राज्यातील सतना येथे ६ मार्चला ७ आरोपींनी स्थानिक बँकेच्या बाहेर दिवसाढवळ्या वाईन शॉपच्या व्यवस्थापकावर गोळ्या झाडून हत्या केली होती. तसेच घटनास्थळावरून २२ लाख रुपये लुटून नेले होते. तेथील पोलिसांनी ५ आरोपीला अटक केले होते तर एकाचा एन्काऊंटर केला होता व या गुन्ह्याचा मुख्य आरोपी फरार होता. यातील मुख्य आरोपी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे त्याच्या मामाच्या घरी लपल्याची माहिती मध्यप्रदेश पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्या पोलिसांनी मागील तीन दिवसांपासून नालासोपारा शहरात येऊन आरोपीचा ठावठिकाणा शोध घेण्यास सुरुवात केली पण त्यांना निराशा मिळाली.
शेवटी सोमवारी दुपारी ते पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांकडे मदतीसाठी गेले. पेल्हार पोलिसांनी सापळा लावून दोन ते तीन तासात या आरोपीला रिचर्ड कंपाऊंडमधून ताब्यात घेतले. निलेश जनार्दन यादव (३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सध्या या आरोपीला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.