नवी मुंबई : मंदिरातून मूर्ती चोरणाऱ्याला पोलिसांनी दोन तासात अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेल्या मूर्ती हस्तगत करण्यात आल्या आहे. मंदिराचे ग्रील तोडून त्याने त्याठिकाणी चोरी केली होती. तुर्भे नाका येथील एसके व्हील्स येथील मंदिरात हा प्रकार घडला होता. त्याठिकाणी असलेल्या मंदिरात राम, सीता व लक्ष्मण यांची पंचधातूची मूर्ती बसवण्यात आली होती.
बुधवारी रात्री मंदिर बंद असताना अज्ञात चोरट्याने मंदिराचे ग्रील तोडून मूर्ती चोरून नेल्या होत्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान चोरट्याकडून मूर्तीची विल्हेवाट लावली जाण्याची शक्यता होती. यामुळे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक राजेंद्र घेवडेकर यांच्या पथकाने तातडीने तपासाला सुरूवात केली.
घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीमुळे काही माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्याद्वारे संशयित गुन्हेगाराचा सुगावा घेत प्रदीप मल्लिकार्जुन वाघमारे (२०) याला पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. तो सानपाडा येथे राहणारा असून गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याकडून चोरीची ७ किलो वजनाची पंचधातूची ६० हजार रुपये किमतीची मूर्ती हस्तगत करण्यात आली आहे. त्याने इतरही काही गुन्हे केले आहेत का ? याचा अधिक तपास तुर्भे एमआयडीसी पोलिस करत आहेत.