मुंबई : डोक्यावर दीड लाखाचे कर्ज. त्यात बहिणीच्या लग्नासाठी पैसे नसल्याच्या नैराश्यात पत्नी आणि दोन मुलांना विष देऊनशकील जलील खान (३४) या व्यापाऱ्याने गळफास घेत आयुष्य संपविल्याचा धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी दोन महिन्याने शिवाजी नगर पोलिसांनी मृत खान विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
शिवाजी नगरच्या रोड क्रमांक १४ येथील इंदिरानगर झोपडपट्टीत खान कुटुंबीय राहण्यास होते. शकील जलील खान (३४) यांचा पान, सुपारी विक्रीचा व्यवसाय होता. पत्नी रजिया (२५), मुलगा सरफराज (७) आणि मुलगी अतिसा (३) असे त्यांचे हसते खेळते कुटुंब होते. २९ जुलै रोजी खान यांचा भाऊ रात्री जेवण उरकून घराबाहेर पडला. सकाळी घरी परतला तेव्हा, आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने त्यांना संशय आला.
जलील फोनही घेत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करताच, जलील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तर, रजिया यांच्या एका बाजूला सरफराज तर दुसऱ्या बाजूला कुशीत अतिसा बेशुद्धावस्थेत दिसून आली. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी, तात्काळ सर्वाना जवळच्या सरकारी रग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले आले.
शिवाजी नगर पोलिसांनी केलेल्या तपासात खान याच्यावर दीड लाखाचे कर्ज होते. तसेच त्याला बहिणीच्या लग्नाचा खर्च स्वतः उचलायचा होता. मात्र त्यासाठीही पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे तो नैराश्येत होता. याच तणावातून त्याने पत्नी आणि मुलांना शीतपेयातून विष देत स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, खान विरोधात रविवारी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्येचा गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दुजोरा दिला आहे.