मुंबई : आईने अन्य आरोपींच्या मदतीने बनावट सह्यांचा आधार घेत सव्वा पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करत मुलीने एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर आईसह तिघांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे.
लोअर परळ येथील रहिवासी असलेल्या ३४ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, ५८ वर्षीय डॉक्टर आईसह रेहान शेख (४६) नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ५ कोटी ३८ लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. तक्रारीनुसार, आईनेच रेहान तसेच अन्य व्यक्तींच्या मदतीने खोटी स्वाक्षरी केलेली कागदपत्र कंपनीमध्ये सादर करत डिमॅट अकाउंट उघडले. त्यानंतर तक्रारदार व त्यांचे पती परदेशात असताना त्यांच्या बचतीचे एक कोटी सतरा लाख रुपये आईने परस्पर शेअर्स मार्केटमध्ये विविध कंपन्यांमध्ये गुंतवले.
कालांतराने शेअर्स मार्केटमध्ये गुंतवलेले एक कोटी सतरा लाखांचे शेअर्सचे भाव वाढून सुमारे सव्वा तीन कोटी झाले. तसेच बनावट डिमॅट अकाउंट तयार करून ते परस्पर ट्रान्सफर करून एकूण सव्वा पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे.