कोझिकोड - लग्नाला मोजून २० दिवसच झाले होते आणि नवरा आणि नवरीसोबत केरळमध्येनदी किनारी फोटो शूट करताना अपघात घडला. ही घटना केरळमधील जानकीकाडूनजवळील कुट्टियाडी नदीच्या किनारी घडलेली आहे. सोमवारी येथे नवरा आणि नवरी फोटोशूटचा आनंद घेत होते. यादरम्यान नवरदेवाचा पाय सरकला आणि सोबतच नवरीदेखील वाहत्या पाण्यात वाहू लागली. या घटनेत नवरदेवाचा मृत्यू झाला आहे.
नवरी पाण्यात बुडताना पाहून तिला वाचवण्यात आलं आणि एका खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. या अपघातात नवरीलाही गंभीर जखम झाली आहे. १४ मार्च रोजी दोघं लग्नाच्या बेडीत अडकले होते. नवरदेवाचे नाव रेजिल असल्याचं समोर आलं असून तो पेरंबराजवळील कांडियगडचा राहणारा होता. फोटोशूट करताना रेजिलचा पाय दगडावरून घसरला. त्याच्यासोबत नववधू देखील पाण्यात पडली. कुट्टियाडी नदीमध्ये यापूर्वी अनेकांचे अपघात झाले आहेत. रेजिल येथील रहिवासी असल्यानं त्याला या गोष्टींची माहिती होती. तरीही ते दोघं फोटोशूटसाठी या नदीवर गेले होते. या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे, अशी माहिती पेरूवन्नमुझी पोलिसांनी दिली.
स्थानिकांनी नदीत उडी घेत दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही पाण्याबाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी रेजिलला मृत घोषित केले. त्याची पत्नी सध्या अत्यावस्थ असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंधरा दिवसांपूर्वी ज्या घरातून लग्नाची वरात निघाली होती, आज त्याच मुलाची अंत्ययात्रा निघाल्याने आई-वडिलांनी हंबरडा फोडला. तसेच तरुण मुलगा गमावल्याने गावात देखील दुःख व्यक्त केले जात आहे.