नवी मुंबई - दिघा परिसरातील ताडी विक्री केंद्रात गुंडाने केलेल्या मारहाणीमध्ये राज उतेकर या २० वर्षाच्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असून गुंड सोनू पांडे याला अटक करण्यात आली आहे.भोलानगर परिसरात राहणारे राज उतेकर, राजु सुर्यवंशी व कल्पेश पाटील हे तिघे मित्र बुधवारी रात्री कामावरून आल्यानंतर ईश्वरनगरमधील ताडी विक्री केंद्रात रात्री ९ च्या दरम्यान ताडी पित होते. त्याच वेळी परिसरात गुंडगिरी करणारा सोनु पांडे त्याच्या मित्रांसाेबत आला व ताडी केंद्र चालविणारांकडे पैसे मागू लागला. यानंतर तेथे बसून ताडी पिऊ लागला.
त्यावेळी शेजारच्या टेबलवरून बसलेल्या राज उतेकर मित्रांसोबत बोलत असताना सोनुने त्याला आवाज कमी करण्यास सांगितले व शिवीगाळ सुरु केली. माझ्यासमोर आवाज करणार का अशी धमकी देत मारहाण सुरु केली. छातीवर व पोटावर लाथा, बुक्यांनी मारहाण केल्यामुळे राज बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले.
या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सोनु पांडे याला गुरुवारी सकाळी सापळा रचून अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.