नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविद्यालयात जाणाऱ्या एका विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यात अखेर नागपूर पोलिसांना यश आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा विनयभंग करताना तो नजरेता आला व त्यानंतर त्याला पोलिसांनी पकडले. चौकशीदरम्यान तोच अत्याचार करणारा नराधम असल्याची बाब समोर आली. मागील १२ दिवसांपासून तो फरार होता.
प्रफुल्ल (२३) असे आरोपीचे नाव असून तो बुटीबोरी येथील निवासी आहे. ४ ऑक्टोबर रोजी हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत एका झुडूपात १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीवर अत्याचार झाला होता. ती विद्यार्थिनी महाविद्यालयात जात असताना त्याने तिला मागून पकडले व कुऱ्हाडीचा धाक दाखवत अत्याचार केला. विद्यार्थिनीचा फोन सुरू असल्यामुळे तिच्या बहिणीला हा प्रकार कळाला व तिने महाविद्यालयात याची माहिती दिली. कर्मचारी धावून आले असता आरोपी फरार झाला.
घटनास्थळावरून पोलिसांना आरोपीची कुऱ्हाड सापडली होती. पोलिसांकडून मोठी तपासयंत्रणा राबविण्यात आली होती. रविवारी रात्री अकरा वाजता आरोपी प्रफुल्ल हा बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत होता. तो झुडूपांच्या दिशेने जाणाऱ्या महिलांचा शोध घेत होता. यावेळी त्याने एका महिलेसोबत आक्षेपार्ह वर्तन करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
बेलतरोडी पोलिस ठाण्याचे बीट मार्शल तातडीने तेथे पोहोचले व त्यांनी प्रफुल्लला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची व संभ्रमित करणारी उत्तरे देत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झुडूपात का फिरत होता हे तो पोलिसांना सांगू शकला नाही. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त मुमक्का सुदर्शन, अनुराग जैन, विजयकांत सागर पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता प्रफुल्लने अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची कबुली दिली.