नवी दिल्ली - अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कौशिक यांच्या मृत्यूचं कनेक्शन राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील उद्योगपती कुबेर गुटखा ग्रुपचे मालक विकास मालू यांच्याशी जोडले गेले आहे. विकास होळीनिमित्त सरदारशहरमध्ये रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करतो. मागील काही वर्षापासून सतीश कौशिक याठिकाणी हजेरी लावायचे.
२०१९ पासून होळी साजरी करण्यासाठी सतीश कौशिक विकास मालू यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे. यावेळीही विकास मालूने होळी खेळल्यानंतर रात्री उशिरा दिल्लीच्या त्यांच्या फार्महाऊसवर गेले. त्याठिकाणी निवडक लोकांसोबत पार्टी केली. त्यात सतीश कौशिकही हजर होते. त्याच रात्री कोशिक यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. सतीश कौशिक यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना फार्महाऊस येथून हॉस्पिटलला नेताना गुरुग्रामच्या रस्त्यावर त्यांनी वाटेतच अखेरचा श्वास घेतला. पोलीस सूत्रांनुसार, ज्या फार्महाऊसवर पार्टी होती ते कुबेर गुटखा मालक विकास मालू यांचे आहे.
विकास मालू हा एका बलात्कार प्रकरणात फरार आहे. अटक टाळण्यासाठी तो अनेकदा दुबईत राहतो. विकास आधी आपल्या गावचा होळी कार्यक्रम झाल्यानंतर पार्टीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत गेला होता. या निवडक लोकांमध्ये एक बिल्डरही होता. ज्याचे वसंत कुंज, द्वारका आणि जनकपुरी इ. ठिकाणी प्रॉपर्टीचा व्यवसाय आहे. त्यांचे एका विशेष पोलीस आयुक्तांचे चांगले संबंध आहेत.
प्रकरण मिटवण्याची जबाबदारी बिल्डरवर दिलीसतीश कौशिक यांच्या मृत्यूची खबर मिळताच विकास मालू दुबईला गेले. मालूने त्यावेळी पार्टीत सहभागी असलेल्या बिल्डरला प्रकरण मिटवण्याची जबाबदारी दिली. बिल्डरने रात्री एका विशेष आयुक्ताला कॉल करून पूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर विशेष आयुक्ताने एका अधिकाऱ्यावर प्रकरण सांभाळण्याची जबाबदारी दिली. रात्रभर अधिकारी आणि बिल्डर यांच्यात संवाद झाला. प्रकरणात फार्महाऊसच्या मालकाचे नाव येऊ नये. त्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याचंही समोर येत आहे.
पोलिसांनी पोस्टमोर्टम करून सतीश कौशिक यांचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला. त्यानंतर आता विकास मालूच्या पत्नीने दिल्ली पोलिसांना लिहिलेल्या पत्रानुसार, १५ कोटींच्या व्यवहारावरून मालू यांनीच सतीश कौशिक यांची हत्या केली असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विकास मालू याच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.