डोंबिवली: येथील पुर्वेकडील टिळकचौक परिसरातील आनंद शिला सोसायटीत राहणा-या विजया बाविस्कर या 58 महिलेची घरात घुसून हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. दरम्यान या गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याकामी नेमण्यात आलेल्या पाच विशेष पथकांनी कसोशीने केलेल्या तपासात हत्या करणा-या सिमा अनिल खोपडे रा. पाथर्ली, डोंबिवली या 40 वर्षीय महिलेला अटक केली आहे. आरोपी सिमा आणि मृत विजया यांची जुनी ओळख होती. 16 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचे उघड झाले आहे.
घटस्फोटीत असलेल्या विजया घरात एकटयाच राहत होत्या. सकाळी घरकाम करणारी महिला आली असता तेव्हा विजया यांच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला. आरोपीचा शोध घेण्याकामी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायय्क पोलिस आयुक्त जयराम मोरे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकनगर पोलिसांसह मानपाडा, रामनगर , विष्णुनगर अशा डोंबिवलीतील चारही पोलिस ठाण्यातील अधिका-यांची पाच विशेष पथके नेमली होती. तपासाची दिशा मिळण्यासाठी आनंद शिला इमारतीच्या आजुबाजुला दुकानांमध्ये तसेच इमारती, रस्त्यांवर लावलेले तब्बल 50 ते 60 सीसीटिव्ही कॅमेरे तपासण्यात आले.
एका सीसीटिव्ही कॅमेरात आरोपी सिमा बिल्डींगच्या परिसरातून रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास जाताना दिसून आली. एवढया रात्री महिला कुठे जात होती याबाबत तपास पथकांचा संशय बळावला आणि तीचा थांगपत्ता शोधत तीला पाथर्ली येथील घरातून मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. पोलिस खाक्या दाखविताच तीने गुन्हा कबुल केला असून जूनी ओळख असलेल्या विजया यांच्या घरी झोपण्याच्या बहाण्याने जाऊन सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने विजया यांची हत्या झाल्याचे आफळे यांनी सांगितले.पोळी भाजी केंद्रावर जप्तीची नोटीससिमा आणि तिच्या नव-याचे पाथर्लीत पोळी भाजी विक्री केंद्र आहे. पतपेढी आणि बँक असे मिळून त्यांच्यावर 16 लाखांचे कर्ज होते. त्याची परतफेड करता येत नसल्याने पोळी भाजी केंद्रावर जप्तीची नोटीस बजावली गेली होती. हे कर्ज फेडण्यासाठी सिमाने चोरीचे पाऊल उचलले. मृत विजया यांच्या अंगावरील चेन, रिंगा, अंगठी, दोन बांगडया असा सोन्याचा ऐवज सिमाने चोरला होता.