Kanpur Murder Case ( Marathi News ) : नदीत मृतदेह आढळलेल्या एका वृद्धाच्या मृत्यूचे गूढ अखेर १७ दिवसांनी उलगडलं आहे. सदर वृद्धाची हत्या झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील ही घटना आहे. या वृद्धाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याचा दावा सुरुवातीला केला जात होता. मात्र आता घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून यामध्ये दोन व्यक्ती एका मोठ्या बॉक्समधून वृद्धाचा मृतदेह नाल्यात फेकत असल्याचं आढळून आलं आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे बर्रा येथील रहिवासी असलेले ६० वर्षीय सुनील जयस्वाल हे कामानिमित्त कानपूर शहरात वास्तव्यास होते. मात्र २१ डिसेंबर रोजी नाल्यात त्यांचा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती सुनील जयस्वाल हे ज्या टेंट हाऊसमध्ये काम करत होते त्याच्या मालकाने जयस्वाल यांचा मुलगा आणि पत्नीला दिली. पित्याच्या मृत्यूची माहिती मिळताच सुनील जयस्वाल यांचा मुलगा गौतम जयस्वाल आणि पत्नीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मुलाने तातडीने पोलिसांना बोलावत आपल्या वडिलांचा नाल्यात शोध घेण्याची विनंती केली. मात्र आता अंधार पडला असून सकाळी आपण शोध मोहीम राबवू, असं संतापजनक उत्तर पोलिसांनी दिलं.
पोलिसांच्या या उत्तरानंतर गौतम जयस्वाल याने स्वत:च नाल्यात उडी घेतली आणि वडिलांचा शोध सुरू केला. तेव्हा त्याला सुनील जयस्वाल हे नाल्यात बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांचा श्वास सुरू असल्याचं लक्षात येताच गौतमने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून जयस्वाल यांना मृत घोषित केलं.
सुनील जयस्वाल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्हीनुसार, जयस्वाल यांना मारहाण करून त्यांचा मृतदेह बॉक्समधून पाण्यात टाकण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. कामाचे पैसे मागितल्याने टेंट हाऊसच्या मालकानेच माझ्या वडिलांना आपल्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने मारहाण करून त्यांची हत्या केल्याचा आरोप मुलगा गौतम जयस्वाल याने केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुनील जयस्वाल आणि टेंट हाऊसच्या मालकामध्ये पैशावरून भांडणही झाले होते. त्यामुळे जयस्वाल यांच्या मृत्यूप्रकरणी टेंट हाऊस मालकावर संशयाची सुई असून याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.