नवी दिल्ली- 'सरल वास्तू'फेम चंद्रशेखर अंगाडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी यांची मंगळवारी कर्नाटकातील हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलं असून बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यावेळी चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येमागील गूढ पोलिसांनी उलघडलं आहे.
चंद्रशेखर गुरुजींच्या हत्येनंतर काही तासांमध्येच पोलिसांनी त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मंजुनाथ मारेवाड आणि महांतेश अशी या दोन आरोपींची नावं आहेत. चंद्रशेखर यांचा बहुतांश व्यवसाय आरोपी महांतेश शिरुरु पाहत होता. त्यामुळे चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येमागे पाच कोटींची मालमत्ता विकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अनेक दिवसांपासून बेनामी मालमत्ता विकून पाच कोटी देण्यासाठी चंद्रशेखर यांच्यावर दबाव आणला जात होता, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. शिरूर यानं चंद्रशेखर यांचा विश्वास संपादन केला होता. पण, एक मालमत्ता पाच कोटींना विकल्यावरून गदारोळ झाला. यामुळं महांतेशला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि याच मुद्द्यावरून झालेल्या वादातून हा खून झाला, असं पोलिस तपासात समोर आलं आहे.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी गुरुजींच्या कुटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानिमित्त आयोजित शोकाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गुरुजी येथे आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, गुरुजींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. त्यांनी हे हत्याकांड क्रूर आणि दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे.