लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चेंबूरमध्ये राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. त्यात, मुलीकडे मोबाइल नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, तपासादरम्यान, परिसरातून बाहेर पडताना एका मुलाने त्यांना जेवणाचा डब्बा दिल्याची माहिती एका लहान मुलाकडून मिळाली. हाच धागा पकडत चुनाभट्टी पोलिसांनी अवघ्या चार तासांत, दोघीही बेंगलोर येथे जात असताना त्यांना पुण्यातून ताब्यात घेतले. परिसरातील दोन मुलांसोबत दोघी गेल्याचे तपासात समोर आले आहे.
सीसीटीव्ही तपासले
पोलिसांनी दोघींच्या मित्र-मैत्रिणीकडे चौकशी केली. यावेळी परिसरातील दोन मुलांसोबत त्या गेल्याची माहिती समोर आली. परिसरातून बाहेर पडताना एका मुलाने त्यांना जेवणाचा डबा दिला होता. पुढील तपासात मुली लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गेल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही तपासले असता त्या बंगलोर येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्याचे दिसले. त्यानुसार पोलिसांनी पुणे रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यांना व दोन मुलांना पुणे येथून ताब्यात घेतले. मुली सुखरूप परत आल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला.