सांगली : येथील बाजार समितीजवळील रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवरील दरोडाप्रकरणी चौघांची नावे अखेर निष्पन्न झाली आहेत. गणेश उध्दव भद्रेवार (वय २४, रा. हैद्राबाद ), प्रताप अशोकसिंग राणा ( रा. वैशाली, बिहार ), कार्तिक नंदलाल मुजुमदार (२३, रा. हुगळी, पश्चिम बंगाल) आणि प्रिन्स कुमार सिंग (२४, रा. वैशाली, बिहार ) अशी संशयितांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत दिली.४ जून रोजी रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकून सहा कोटी ४४ लाख रुपयांचे सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने लंपास करण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून या दरोड्याचा तपास पोलिस करत आहेत. टोळीतील प्रत्येकाला एकच काम द्यायचे आणि ते पूर्ण करून घ्यायचे नियोजन ते करत होते. भद्रेवार याने सांगलीतील रेकी केली होती. तीन महिन्यांपासून ते दरोड्याच्या तयारीत होते. यासाठी ते सांगलीत न राहता कोल्हापूरात राहीले होते, अशीही माहिती अधीक्षक डॉ. तेली यांनी दिली. लवकरच त्यांना जेरबंद करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या टोळीने चन्नई, उदयपूर, जाजपूर(उडिसा) येथेही दरोडे टाकले आहेत. प्रत्येकवेळी टोळीतील सदस्यांच्या कामात आदलाबदल करण्यात येत असे. शिवाय ‘कोअर टिम’कडून याबाबत नियोजन करण्यात येत होते. एकावेळी अनेक दरोड्याची तयारी न करता एकावेळी एकच ‘टार्गेट’ करून तिथेच दरोडा टाकण्याची या टोळीची पध्दत आहे.
प्रताप राणा उच्चशिक्षीत
या टोळीतील प्रताप राणा याचे बी टेक पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यामुळे अत्यंत सूक्ष्मपणे, तांत्रिकदृष्ट्या नियोजन करूनच दरोडा टाकण्यात आला आहे. यापूर्वी प्रताप राणा याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर त्याने गोळीबार केल्याचेही अधीक्षक डॉ. तेली यांनी सांगितले.
वाहन विकणाऱ्या ॲपवरून खरेदी
वाहन विक्रीसाठी ॲपवर माहिती टाकणाऱ्या वाहनांचे क्रमांक ते गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसाठी वापरत होते. वाहने घेतानाही ते फायनान्स कंपन्यांकडून अथवा ॲपवरूनच व्यवहार करत होते. सांगलीतील गुन्ह्यासाठी वापरलेली मोटार ठाणेतून तर दुचाकी गुलबर्गा येथून अशाचपध्दतीने विकत घेतली होती.
हैद्राबादमध्ये झाली ओळख
हैद्राबादमधील रामोजी फिल्मसिटीमध्ये टोळीतील सदस्यांची ओळख झाली होती. यानंतर वेगवेगळ्या राज्यातील असतानाही एकत्र येत रिलायन्ससह एका फायनान्स कंपनी कार्यालयावर त्यांनी दरोडे टाकले आहेत.