औरंगाबाद : दुर्लभ कश्यप गँगच्या नावाने पुंडलिकनगर परिसरात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड शुभम सुरेश मोरे (२२, रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) याला पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी वर्षभरासाठी ‘एमपीडीए’खाली हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी दिली.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथील दुर्लभ कश्यप हा अतिशय कमी वयात गुंड म्हणून कुख्यात झाला होता. त्याच्यासारखा पेहराव करून कश्यप गँग नावाने काही तरुण पुंडलिकनगर हद्दीत धुमाकूळ घालत होते. या टोळीतील शुभम मोरे हा २२व्या वर्षी कु्ख्यात आरोपी बनला.
पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, दिलीप गांगुर्डे, सहायक पोलीस निरीक्षक शेषराव खटाने, सहायक उपनिरीक्षक द्वारकादास भांगे, रमेश सांगळे, अंमलदार बाळाराम चौरे, राजेश यदमळ, गणेश डोईफोडे, गणेश वैराळकर, शिवाजी गायकवाड, महादेव दाणी, दीपाली सोनवणे यांच्या पथकाने शुभम मोरेचा ‘एमपीडीए’चा प्रस्ताव तयार केला.
गंभीर गुन्ह्यांची नोंदआरोपी शुभम मोरे याच्या विरोधात पुंडलिकनगर ठाण्यात मुलींची छेड काढणे, बालकांचा लैंगिक छळ, बेकायदा शस्त्र बाळगणे, जीवघेणा हल्ला करणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा करणे, शांतता भंग होईल असे वागणे, धाकदपटशा करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.