अजय जाधव -
उंब्रज - उंब्रज येथील प्रसिद्ध उद्योगपती प्रल्हाद घुटे (वय ८०) यांना त्यांच्या मुलानेच बंगल्यात डांबून ठेवून रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही, तर कऱ्हाड येथील उपनिबंधक कार्यालयात नेऊन जबरदस्तीने कुलमुखत्यारपत्र व बक्षीसपत्रही केले. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा, सून, नातू व नातसून यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन प्रल्हाद घुटे, वंदना नितीन घुटे, शुभम नितीन घुटे, टिना शुभम घुटे (सर्व, रा. उंब्रज ता. कऱ्हाड), उत्तम आनंदा केंजळे (रा. चरेगाव, ता. कऱ्हाड), कल्याण खामकर (रा. कारंडवाडी ता. कऱ्हाड), गणेश बबन पोटेकर, संदीप हणमटे पोतले (दोघेही, रा. मुंढे, ता. कऱ्हाड), दिगंबर रघुनाथ माळी (रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रल्हाद गणपती घुटे (वय ८३, रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) हे उद्योगपती असून, ते त्यांचा लहान मुलगा नितीन घुटे याच्याकडे राहत असताना तुमची सर्व प्राॅपर्टी ही माझ्या नावावर करा, असे म्हणत होता. याला त्यांनी नकार दिला. यावरून वरील संशयितांनी आपापसांत संगनमत करून प्रल्हाद घुटे यांना बंगल्यातील पहिल्या मजल्यावरील खोलीत कोंडून डांबून ठेवले. तसेच रूममधून बाहेर पडण्यास बंदी केली. मुलगा नितीन याने हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात प्रल्हाद घुटे यांचा उजव्या बाजूचा दात पडला. तसेच हाताने उजव्या डोळ्यावर मारल्याने डोळ्याला जखम झाली होती. प्रल्हाद घुटे यांना रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखवून, जिवे ठार मारण्याची धमकी देऊन ‘मी जिथे सांगेन त्या ठिकाणी सही व अंगठा करायचा’, असा दबाव टाकला. यानंतर त्याने त्याचे चारचाकी गाडीमध्ये जबरदस्तीने घालून कऱ्हाड येथील रजिस्टर नोंदणी कार्यालयामध्ये नेले.
तेथे त्यांच्या इच्छेविरुद्ध कुलमुखत्यारपत्र हे नितीन याने स्वत:चे नावे व बक्षीसपत्र नातू शुभप घुटे याच्या नावावर बेकायदेशीर पद्धतीने करून घेतले.