मुंबई: अंधेरी मध्ये बोलबच्चन टोळीच्या दोघांनी एका वृद्धाला गंडा घालत लाखभर रुपयाचे दागिने पळवून नेले. या विरोधात त्यांनी अंधेरी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोगेश्वरी पूर्व परिसरात राहणारे गणेश नलावडे (६३) हे अंधेरी मार्केटमध्ये किरकोळ सामान आणायला गेले होते. ते मोरबापाडा सर्विस रोड याठिकाणी पायी चालत निघाले असताना मोटरसायकलवरून आलेल्या व्यक्तीने काका जरा थांबा, या रस्त्यावर फार चोऱ्या होतात तुमचे सामान या रुमालात बांधा असे त्यांना सांगितले. नेमके त्याच वेळी त्याठिकाणी आलेल्या अन्य अनोळखी इसमाने स्वतःच्या वस्तू रुमालात बांधत त्या पहिल्या इसमाच्या हातात दिल्या.
ते पाहून नलावडे यांनीही त्यांच्या गळ्यातील चैन सोन्याचे लॉकेट घड्याळ आणि रोकड रुमालात बांधत त्या इसमाला दिले. त्यानंतर नलावडेंना बांधलेला रुमाल परत केला आणि दोन्ही अनोळखी इसम मोटरसायकलवर बसून निघून गेले. शंका आल्याने नलावडे यांनी रुमाल उघडून पाहिला तेव्हा त्यात निव्वळ घड्याळ आणि ६०० रुपये सापडले. तर ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मात्र गायब होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अंधेरी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी भामट्यांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३४, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.