एका महिलेने तिच्या नवजात अर्भकाचा जन्मताच जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील साऊथ कॅरोलिना येथे एका महिलेने तिच्या बाळाला जन्म दिल्यानंतर काही वेळातच ठार मारल्याचं उघड झालं आहे. एवढंच नाही तर या महिलेने बाळाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये पॅक करून दुसऱ्या खोलीत फेकून दिला.
दरम्यान, आरोपी महिलेविरोधात पोलिसांनी अटक वॉरंट काढलं आहे. या महिलेवर प्रसुतीवेळी तिने तिच्या बाळाची हत्या केल्याचा आरोप आहे. याबाबत पोलिसांनी काढलेल्या वॉरंटमधील उल्लेखानुसार या महिलेने प्रसुतीवेळी गर्भनाळ कापल्यानंतर नवजात बाळावर ओपनरने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर या बाळाचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये बंद करून दुसऱ्या खोलीत फेकून दिला.
या घटनेबाबत एका पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, मी माझ्या २५ वर्षांच्या सेवेत एवढा भयानक प्रकार पाहिला नाही. जेव्हा रुग्णालयातील प्रशासनाने बोलावल्यानंतर आम्ही इथे पोहोचलो, तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली. या महिलेवर बाल शोषण आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.