शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : विमा मिळविण्यासाठी घरफोडीचा बनाव करणाऱ्या दुकानदारासह त्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. आकाश प्रकाश सूर्यवंशी (रा. जैन बस्तीजवळ, इनामधामणी, ता.मिरज) आणि अक्षय संजय बोगारे (२१, मूळ रा. कळंगा तर्फ ठाणे, ता. करवीर, जि. कोल्हापूर, सध्या रा. विजयनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे बूट आणि दुचाकी असा ७२ हजार ६७६ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
संशयित आकाश सूर्यवंशी याचे विश्रामबाग येथील गणपती मंंदिर रस्त्यावर स्पोटर्स शूज विक्रीचे दुकान आहे. या दुकानात चोरी करून चोरट्यांनी दोन लाखांचे बूट लंपास केल्याचे फिर्याद त्याने पोलिसांत दिली होती.
एलसीबीचे पथक गस्तीवर असताना, शहरातील शंभरफुटी रस्त्यावर पांढरे पोते घेऊन दोघे जाताना पथकाला आढळून आले. यावेळी केलेल्या तपासणीत पोत्यात स्पोटर्स शूज होते. याबाबत माहिती घेतली असता, त्यांनी सूर्यवंशी यानेच चोरीचा बनाव केल्याचे समोर आले. यातील संशयित अक्षय आणि त्याचे साथीदार शाम औलकी आणि विजय खुटाळे (दोघेही रा. कळंबा ता. करवीर जि. कोल्हापूर) यांनी ही चोरी केल्याचे कबूल केले.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, कुमार पाटील, अमर नरळे, विक्रम खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दुकान तोट्यात; केला बनाव
संशयित सूर्यवंशी याचे स्पोटर्स शूज विक्रीचे दुकान तोट्यात होते. यामुळे आपल्याची साथीदारांकरवी त्याने चाेरी केली आणि दुकानात असलेल्या मालापेक्षाही जादा माल पोलिसातील तक्रारीत दाखविला होता. विमा कंपनीकडून जास्तीत जास्त क्लेम मिळविण्यासाठी त्याने ही शक्कल लढविली होती. मात्र, पोलिसांच्या नजरेतून ही चालाखी सुटली नाही.