वर्धा : कोविड संकट काळात शाळा बंद होत्या. अशातच नवव्या वर्गाचे शिक्षण घेणारी सेलू तालुक्यातील एक विद्यार्थिनी घरी होती. ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली असता सुनील सीताराम पाटील याने बाथरूममध्ये येत मुलाचा विनयभंग केला. या प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवून वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दंडासह तीन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला आहे.
सुनील पाटील रा. तुळजापूर ता. सेलू याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ०८ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांचा कारावास, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये एक वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
दहेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता गुन्हानवव्या वर्गाचे शिक्षण घेणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याने सुनील सीताराम पाटील याच्याविरुद्ध तक्रारीवरून दहेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रीती आडे यांनी पूर्ण करून प्रकरण न्याय प्रविष्ट केले. या प्रकरणाची शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी न्यायालयात मांडली. त्यांना ॲड. स्वाती एन. गेडे (दोडके) यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून अनिल मोहड यांनी काम पाहिले. शासना तर्फे एकूण सहा साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. पुरावे, दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.