खामगाव - जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील एका खेड्यात अल्पवयीन बालिका दुपारी नैसर्गिक विधी करिता गेली होती. तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला भादंवि कलम ३५४ गुन्ह्यात तीन वर्ष तसेच बालकांच्या लैंगिक छळाच्या गुन्ह्याकरिता एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच दोन्ही गुन्ह्याकरिता प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा महत्वपूर्ण निकाल खामगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रसाद कुलकर्णी यांनी शुक्रवारी दिला.
याबाबत सविस्तर असे की, घटनेच्या दिवशी दुपारी २.३० वा. अल्पवयीन मुलगी ही नैसर्गिक विधी करिता गेली होती. त्यावेळी आरोपी सिद्धार्थ रामा वाकोडे, हा बायकांच्या गोदरीत झुडपांमध्ये लपून बसला. त्यावेळी सदर बालिका नैसर्गिक विधी करीत असताना गोदरीमध्ये कोणीतरी लपून बसले असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यावेळेस तिने कोण आहे असे विचारले असता आरोपी विचित्र आवाज करत झुडपातून एकदम बाहेर आला. त्यामुळे पिडीत बालिका घाबरून घराकडे धावत सुटली. दरम्यान बालिकेचे वडील व गावकरी गोदरी च्या दिशेने धावत आले. त्यावेळी आरोपीला पकडण्यात आले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात तपासी अंमलदार अरुण किरडे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने या प्रकरणात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. पुराव्यांती आरोपी हा दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालयाने आरोपीस उपरोक्त शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर, यांनी काम पाहिले.