Chhagan Bhujbal Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री एका व्यक्तीने फोन करून ठार मारण्याची धमकी दिली. छगन भुजबळ यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर फोन करून त्याने ही धमकी दिली. दरम्यान या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात तपास करून संबंधित तरुणाला महाड येथून ताब्यात घेतले. प्रशांत पाटील असं धमकी देणाऱ्या या तरुणाचं नाव आहे. दारूच्या नशेत त्याने ही धमकी दिल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
मंत्री छगन भुजबळ सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. सोमवारी रात्री त्यांचा मुक्काम पुण्यातील व्हीआयपी सर्किट हाऊस या ठिकाणी होता. दरम्यान सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भुजबळांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. त्याने "मला त्यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे, उद्या मी त्यांना मारणार आहे, आपण सांगून काम करतो, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे, मी तुम्हाला सांगण्याचं काम केलं आहे" असे म्हणून समोरील व्यक्तीने फोन कट केला.
पुणे पोलिसांकडे या घटनेची तक्रार आल्यानंतर त्यांनी जलद गतीने तपास केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक तपास करत अवघ्या काही तासात महाड येथून या तरुणाला ताब्यात घेतले. पहाटे सहा वाजता सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून सध्या त्याला पुणे शहराकडे आणले जात आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हे सर्व कृत्य दारूच्या नशेत केले असल्याचे समोर येत आहे. आरोपी तरुण हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील रहिवाशी असून तो ऑपरेटर म्हणून काम करतो. गुगलवर सर्च करून त्याने भुजबळांच्या पीएचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि हही कृती केल्याची माहिती समोर येत आहे. त्याला पुण्यात आल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.