मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने गुरमेल सिंग(२३) याच्यासह दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये तीन हल्लेखोरांचे छायाचित्र असल्याने चारही आरोपींची ओळख पटविण्यात गुन्हे शाखेला यश आले. हत्येपूर्वी जुहू चौपाटीवर फेरफटका मारल्याची आठवण म्हणून त्यांनी हे छायाचित्र काढले होते, असे स्पष्ट होत आहे.
सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारा शिवकुमार ऊर्फ शिवा गौतम २ सप्टेंबरला मुंबईत आला होता. त्यावेळी गुरमेल आणि आणखी एक आरोपीही त्याच्या सोबत मुंबईत आला होता. तिघांनीही सिद्दीकी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी ते नियमित पश्चिम मुंबईत येत होते.
मोबाईलचा वापरआरोपींकडील एक मोबाईल एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी वापरण्यात येत होता, तर दुसरा मोबाईलवरून आरोपी आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होते, असेही सूत्रांनी समजते.
सप्टेंबरमध्ये तिन्ही आरोपी जुहू चौपाटी येथे फिरण्यास गेले होते. त्यावेळी त्यांनी एकत्र छायाचित्र काढले होते. ते एका आरोपीच्या मोबाईलमध्ये सापडले. त्यामुळे शिवकुमारसह अन्य आरोपींची ओळख पटवणे सोपे झाले.