डोंबिवली : शहरातील १२ वर्षांच्या रुद्रा झा याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुरतेहून सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना शनिवारी यश आले. याप्रकरणातील पाच आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, आतापर्यंतच्या तपासात अपहरण कटाचा प्लॅन दोन महिने सुरू होता, तर मुख्य आरोपीच या कटाचा सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले. रुद्राचे ९ नोव्हेंबरला अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी दीड कोटींची खंडणी मागितली होती. फरदशहा रफाई (वय २६) हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर गुजरातमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याचा मेहुणा प्रिंसकुमार सिंग, फरदशहाची प्रेयसी शाहीन मेहतर, त्याची बहीण फरहीन सिंग, पत्नी नाझीया (वय २७) यांना अटक केली आहे.
घरेही घेतली भाड्याने रुद्राचे अपहरण करण्याचा कट त्याने दोन महिन्यांपूर्वी आखला होता. कसे पळायचे, कुठे मुक्काम करायचा याचेही पूर्वनियोजन त्याने केले होते. काही ठिकाणी घरेही भाड्याने घेतली होती, असे चौकशीत उघड झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी आरोपींची पोलिस कोठडी संपत आहे.
मोटारीची खरेदी फरदशहा हा मूळचा गुजरातचा असला तरी तो डोंबिवलीत कुटुंबासह राहत होता. तो ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करायचा, त्याने त्यासाठी कारही खरेदी केली होती. दरम्यान, गुजरातमध्ये त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.