जळगाव : शिवकॉलनी परिसरातील प्रतिक अपार्टमेंटच्याजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पाच दरोडेखोरांना रामानंदनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याजवळून एक पिस्तोल, गुप्ती, चाकू, दोन हातोडया, ब्लेड, मिर्ची पावडर, दोरी आणि दोन हिट स्प्रे जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी ३.५० वाजता झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी दुपारी शिवकॉलनी परिसरातील प्रतिक अपार्टमेंटच्याजवळ ५ व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली होती. त्यांनी पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार करून कारवाई करण्याची सूचना केली. पथकाने लागलीच शिवकॉलनी गाठून पाचही जणांना पकडून त्यांची चौकशी केली. पण, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याजवळ एक पिस्तोल, गुप्ती, चाकू, दोन हातोडया, ब्लेड, मिर्ची पावडर, दोरी आणि दोन हिट स्प्रे, पेंन्चीस आदी साहित्य मिळून आल्यावर पाचही जण दरोडयाच्या तयारीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यांची नावे विचारली असता, त्यांनी खुशाल पांडे, विकी आलोने, नागेश सोनार, वसीम पटेल, पपई उर्फ दुर्गेश संन्याशी ( सर्व रा.जळगाव) असे त्यांची नावे सांगितली. नंतर त्यांना अटक करून पोलिसात ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात भादंवि कलम ३९९, आर्म ॲक्ट ३/२५, ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.यांनी केली कारवाईपोलिस अधीक्षक एम.राजकुमार, उपअधीक्षक संदीप गावित, पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, संजय सपकाळे, सुशिल चौधरी, रेवानंद साळूंखे, रविंद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, अतुल चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दीपक वंजारी आदींनी ही कारवाई केली आहे.