मलकापूर (बुलढाणा) : तडीपार व कुख्यात आरोपी अचानक शहरात दाखल झाला. तसेच त्याने डुकरे बांधण्यावरुन वाद घातल्यावर जखमी कुटुंबाला वाचवण्यासाठी पोलिसांचे डी. बी. पथक पोहोचले. मात्र त्यांच्याच अंगावर आरोपी तलवार घेऊन धावल्याने पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्याची घटना म्हाडा कॉलनीत शनिवारी रात्री घडली.
शहरातील म्हाडा कॉलनीतील रहिवासी मनोजसिंह टाक ह्याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपात सुमारे २७ गुन्हे दाखल आहेत. दोनदा तडीपार झालेला आरोपी शनिवारी मलकापूर येथील म्हाडा कॉलनीत दाखल झाला. शनिवारी रात्री त्याचा म्हाडा कॉलनीतील रहिवासी ब्रम्हादे कुटुंबातल्या लोकांशी डुकरे बांधण्यावरुन वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यात ब्रम्हादे कुटुंबातील तिघे जखमी झाले. त्या संदर्भात माहिती कळताच पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या आदेशावरून डी.बी.पथक म्हाडा कॉलनीत दाखल झाले.
पोलिसांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कुख्यात आरोपी मनोज सिंह टाक याच्या शोधार्थ पोलिसांनी मोर्चा वळवला. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पोलीस पथकाची म्हाडा कॉलनी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी चाचपणी सुरू झाली. आरोपी नळगंगा नदीच्या बाजूने असलेल्या झुडपात दडून बसल्याचा अंदाज पोलिसांना आला. रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक झुडपात दडून बसलेला मनोजसिंह टाक हा बाहेर आला व हातात तलवार घेऊन पोलीसांच्या दिशेने धावला.
रात्रीच्या किर्रर अंधारात हातात तलवार घेऊन कुख्यात आरोपी पुढे आल्याने बचावासाठी पोलिसांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्या चुकवून आरोपीने रात्रीच्या अंधारात पोबारा केला. डीवायएसपी देवराम गवळी, पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रभर वेगवेगळ्या दिशेने पोलिस आरोपीच्या शोधार्थ रवाना झाले. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक थोरात हे देखील शनिवारी रात्रीच मलकापूरात दाखल झाले. या प्रकरणी कुख्यात आरोपी मनोजसिंह टाक याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचा आरोपीचा शोध घेतला जात आहे.