- मंगेश कराळे
नालासोपारा : अर्नाळा पोलीस ठाण्यात १० लाखांच्या झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी उकल केली आहे. या गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला असून एका आरोपी महिलेला अटक करण्यात आले आहे तर एका फरार सराईत आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी गुरुवारी दिली आहे.
विरारच्या गोकुळ टाऊनशिप रोडवरील विठ्ठल हेव्हन या इमारतीमध्ये राहणाऱ्या भरत कांतीलाल रावल (६२) यांच्या घरी ११ ऑगस्टला लाखोंची घरफोडी झाली होती. चोरट्याने घराच्या सेफ्टी डोअरला लागून असलेल्या दरवाजाचे लॉक तोडून दोन लोखंडी कपाट व तिजोरी फोडून सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. अर्नाळा पोलिसांनी १२ ऑगस्टला घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्यापासून दिवसा घरफोडी चोरीच्या प्रकारात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीत यांचा शोध घेवुन पायबंद करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे व आरोपीतबाबत मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन महिला आरोपी मिनता वसंत राजभर, राहणार डोंबिवली येथून बुधवारी ताब्यात घेवुन तिच्याकडे तपास केला. आरोपी महिलेकडून गुन्हयातील ९ लाख ८४ हजार ७७ रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागीने व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक महिला आरोपीला सदरचा मुद्देमाल घरफोडी चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीताने दिले असल्याचे निष्पन्न होत असुन त्याचा याचा शोध सुरु आहे. सदर कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भुपेंद्र टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, मसुब सागर सोनवणे, गणेश यादव, प्रविण वानखडे, नालासोपारा पोलीस ठाण्याचे होमगार्ड रुपाली विलास आवाडे, आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.