न्यूयॉर्क : जगात बालविवाह होण्याचे प्रमाण कमी होत असले, तरीही याचे प्रमाण इतके आहे की, बालविवाह पूर्णपणे संपण्यासाठी तब्बल ३०० वर्षे लागतील, असे समोर आले आहे.
युनिसेफचा अहवाल तयार करणाऱ्या टीमच्या प्रमुख क्लॉडिया कॅपा म्हणाल्या की, अशा विवाहांमध्ये बहुतांश मुलींचे वय १२ ते १७ वयोगटातील असते. कोरोना महामारी, युद्धे आणि वातावरणातील बदल यामुळे लवकर लग्नाचा धोका वाढत आहे. २०३० पर्यंत कमी वयातील एक कोटींहून अधिक मुलींची लग्ने होण्याची भीती आहे.
६४कोटी महिलांचे लग्न लहान वयातसध्या जगात ६४ कोटी स्त्रिया आहेत ज्यांचे लग्न वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधी झाले आहे. दरवर्षी सुमारे १.२ कोटी मुलींचे लग्न १८ वर्षांआधी केले जाते. असे असले तरी गेल्या २५ वर्षांत बालविवाहांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.
लग्न म्हणजे पोटाची सोय?बालविवाहामुळे असमानतेची समस्या वाढते. अनेक कुटुंब याकडे मुलीच्या संरक्षणाचा मार्ग म्हणून पाहतात.अनेक कुटुंबांसाठी मुलीच्या लग्नाचा अर्थ म्हणजे त्यांच्या घरातील एका सदस्याच्या पोटाची सोय त्यांना करावी लागत नाही.
दक्षिण आशिया हे बालविवाहाचे सर्वात मोठे केंद्र आहे.
बालविवाहाविरोधात भारतात मोहीम सुरू असली, तरीही जगातील ६४ कोटी बालवधूंपैकी एक तृतीयांश बालवधू या भारतात आहेत. युनिसेफ विशेषतः आफ्रिकेच्या सब-सहारा प्रदेशाबद्दल चिंतित आहे, जेथे बालविवाह होण्याचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.