लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिकाधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवून आरबीआयच्या मॅनेजरलाच एका टोळीने ६० लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू असल्याचे सानपाडा पोलिसांनी मंगळवारी सांगितले.
फोर्ट येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे मॅनेजर जयवंत म्हसदे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ते सानपाडा येथे राहायला असून, वर्षभरापूर्वी त्यांना एका महिलेने फोन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले होते. काही महिन्यांनी पुन्हा त्या महिलेने गुंतवणुकीचे फायदे पटवून दिले. तिच्यावर विश्वास ठेवून जयवंत यांनी पत्नीच्या नावे ट्रेडिंग अकाउंट उघडले. मात्र, गुंतवणुकीची रक्कम फोनवरून संपर्क साधणाऱ्या महिलेच्या खात्यावर पाठवली होती. सुरुवातीला काही रक्कम नफा स्वरूपात त्यांना मिळाली होती.
आरोपींची नावेही बनावट?फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर म्हसदे यांनी संपूर्ण रकमेची मागणी केली, तेव्हा संबंधितांनी त्यांच्याशी संपर्क तोडला. शशी जैन, शिखा चौहान, शिवानी चौहान, वेदवती शर्मा, भूपेंद्र सोनी व श्रेया यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, ही नावे बनावट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.