अनिकेत घमंडी/ डोंबिवली: शहरांतील काही रिक्षा चालक हे वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे वाहतूक नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आले।आहे. त्या रिक्षा चालकांचे वाहन क्रमांक, त्यावरील प्रलंबित दंड असे निवडून वाहतूक विभागाने डोंबिवली रेल्वे स्टेशन पूर्वेला ४४ रिक्षा व पश्चिमेला २५ रिक्षा क्रमांक असे एकूण ६९ रिक्षा चालकांचा तपशील विविध चौकात दर्शनी भागात लावण्यात आले आहेत.
शनिवारी ही आक्रमक मोहीम वाहतूक नियंत्रण विभागाने केली. तसेच प्रलंबित ईचलन दंड भरण्यास टाळाटाळ करीत असतात. ज्या रिक्षा चालकांचे वाहनांवर १० हजार रूपयांपेक्षा जास्त दंड प्रलंबित आहे अशा रिक्षा चालकांचे परमिट , बॅच नूतनीकरण व रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांना अहवाल पाठविण्यात आला असून या रिक्षाचालकानी तात्काळ डोंबिवली वाहतूक उपविभाग येथे संपर्क करून दंड भरावा अन्यथा वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांचेकडून संयुक्तपणे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील पूर्व पश्चिमेला ई चलन डिव्हाईसव्दारे, सीसीटिव्ही कॅमेऱ्यांव्दारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर डोंबिवली वाहतूक विभागाकडून नियमितपणे दंडात्मक कारवाई करण्यात येते. परंतू तरीही नियम तोडून मनमानी कारभार करणाऱ्यांवर चाप लावण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
डोंबिवली वाहतूक विभागाकडून सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी त्यांचे वाहनावरील प्रलंबित दंड तात्काळ नजिकच्या वाहतूक शाखेमध्ये अथवा वाहतूक पोलिसांकडे भरावा अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.-उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक उपविभाग
वाहतूक नियंत्रण विभागाने कारवाई।केली त्यावर हरकत नाहीच, परंतु रिक्षा चालकांना स्टॅण्ड नाहीत त्यांनी उभं रहायच कुठे, तसेच हजारो रुपये दंड भरायचा कसा? सामान्य रिक्षा चालकांना कोणी वाली नाही का? त्यांच्या समस्या देखील समजून घ्यायला हव्यात आणि त्याही एवढ्याच तप्तरतेने सोडवाव्यात.-दत्ता माळेकर, जिल्हाध्यक्ष, भाजप वाहतूक सेल, कल्याण