पिंपरी : मावळ तालुक्यातील शिरगाव येथील सरपंचाची तीन अज्ञातांनी कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. शिरगाव येथील साई मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर शनिवारी (दि. १) रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.
प्रवीण साहेबराव गोपाळे (वय ४७), असे खून झालेल्या सरपंचाचे नाव आहे. शिरगाव ग्रामपंचायतीची निवडणूक काही महिन्यांपूर्वीच झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवीण गोपाळे सरपंचपदी विजयी झाले होते. त्यांचा प्लाॅटिंगचा व्यवसाय होता. त्यातूनच त्यांचा काही जणांशी जमिनीशी संबंधित वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रवीण गोपाळे हे शनिवारी रात्री त्यांच्या दुचाकीवरून शिरगाव येथील साई मंदिरासमोर आले होते. ते काही जणांशी गप्पा मारत होते. त्यावेळी मारेकऱ्यांपैकी दोघे जण एका दुचाकीवरून येऊन पाहणी करून गेले. यानंतर पुन्हा थोड्यावेळाने एकाच दुचाकीवरून तिघे आले. त्यांनी मंदिरासमोर असलेल्या प्रवीण गोपाळे यांच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळ उडाला. नागरिकांचा आरडाओरडा झाला. तसेच सर्व जण सैरावैरा पळू लागले. कोयत्याचे वार चुकविण्यासाठी गोपाळे हे देखील पळू लागले. त्यावेळ मारेकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या चेहऱ्यावर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या गोपाळे यांचा मृत्यू झाला.
यानंतर मारेकरी दुचाकीवरून पळून गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.