लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरीवरून बडतर्फ करण्यात आल्याच्या संतापातून एका शिक्षकाने शाळेच्या अध्यक्षाच्या घरात शिरून बेदम मारहाण केली. शिक्षकाने अध्यक्षाचे तोंड पट्टीने चिपकवून लोखंडी रॉडने प्रहार केले व जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नितीन सुरेश येरकर (४०, वडगाव. जि. यवतमाळ) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तर आनंद जिभकाटे (६५, न्यू नंदनवन) असे हल्ला झालेल्या शाळा अध्यक्षकाचे नाव आहे. जिभकाटे यांची पवनी-भंडारा येथे गांधी विद्यालय नावाने शिक्षण संस्था आहे. २०१६ यादरम्यान आरोपी शिक्षक नितीन येरकर एका माध्यमिक शाळेत अतिरिक्त झाला होता. त्याला जिभकाटे यांच्या संस्थेत शिक्षक म्हणून पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांकडून मारहाण केल्याच्या तसेच गैरवर्तन केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे संस्थेने चौकशी करून शिक्षक येरकर याला २०१९ मध्ये बडतर्फ केले. येरकर याने शिक्षणाधिकारी आणि न्यायालयात अर्ज दाखल करून निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. बडतर्फ झाल्यानंतर त्याची पत्नी आणि मुले सोडून गेले. यामुळे येरकर संतापला होता. त्याने जिभकाटे यांना संपविण्याचे ठरविले.
शुक्रवारी दुपारी तीन वाजता तो जिभकाटे यांच्या घरात घुसला. जिभकाटे यांचे हातपाय बांधले आणि तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर त्याने शिवीगाळ करत जिभकाटेंना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यात जिभकाटे यांचे हात जखमी झाले. त्यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने शेजारी धावत आले. त्यामुळे येरकर तेथून फरार झाला. जखमी जिभकाटेंना खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .पोलिसांनी आरोपी येरकरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.