मुंबई: मालाड पश्चिमच्या एका मंदिरामधून देवाचे मुकुट आणि गदा चोरी करण्यात आली. हा प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेमुळे स्थानिक परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मंदिराची देखरेख करणाऱ्या व्यक्तीने मालाड पोलिसात तक्रार केल्यावर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तक्रारदार रविकांत दुबे (३५) यांची मसाला आणि पिठाची गिरणी असून ते गोरसवाडी परिसरात असलेल्या छोट्या हनुमान मंदिराची देखरेख करतात. या मंदिरात हनुमान, गणपती आणि शिवलिंग मूर्ती आहे. दुबे रोज सकाळी ९.३० वाजता मंदिराचे प्रवेशद्वार उघडून त्याची पुजा करतात. त्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास मंदिर बंद करून त्याला व्यवस्थित लॉक लावून नंतरच ते घरी निघतात असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार १४ फेब्रुवारी रोजी देखील नेहमीप्रमाणे रात्री त्यांनी मंदिराचा दरवाजा बंद करून लॉक लावला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते मंदिरात पूजा करण्यासाठी आले. तेव्हा हनुमान आणि गणपतीच्या मूर्तीचे चांदीचे दोन मुकुट तसेच हनुमानाची चांदीची गदा तिथून गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा पहाटे ५.२२ च्या सुमारास एक अज्ञात इसम मंदिराचा दरवाजा न उघडता काहीतरी हातात घेऊन त्याच्या साहाय्याने मुकुट आणि गदा बाहेर काढून घेऊन जात असल्याचे त्यात दिसले. तेव्हा त्याच व्यक्तीने मंदिरातून चोरी केल्याचे उघड झाले. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत एकूण २० हजार रुपये असून या विरोधात त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर भारतीय दंड संहिता कलम ३७९ अंतर्गत पुन्हा दाखल करण्यात आला.