पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: वेर्णा पोलीसांनी दुचाकीवरून जाताना ‘स्टंट’ करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्याचे सत्र चालूच ठेवले असून गुरूवारी (दि.१८) रात्री आणखीन तिघा तरुणांना अटक केली. दक्षिण गोव्यातील वेर्णा - लोटली राष्ट्रीय चौपदरी महामार्गावर दुचाकीवरून जाताना तिघा तरुणांनी ‘स्टंट’ केल्यानंतर त्याचे व्हीडीयो सोशल मीडायावर घातल्यानंतर पोलीसांनी त्वरित दखल घेत त्या तिघांना अटक केली.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी उशिरा रात्री त्या प्रकरणात कारवाई करुन तीन तरुणांना अटक केली. सोशल मीडायावर तीन तरुण वेर्णा - लोटली महामार्गावर दुचाकीने धोकादायक ‘स्टंट’ करून तेथून जाणाऱ्याचा आणि स्व:ताचा जीव धोक्यात घालत असल्याचे पोलीसांना दिसून येताच त्यांनी त्या तरुणांचा शोध घेण्यास सुरवात केली. बेकायदेशीररित्या धोकादायक ‘स्टंट’ करताना त्या तरुणांनी हेल्मेटसुद्धा घातले नव्हते अशी माहीती पोलीसांनी दिली. गुरूवारी वेर्णा पोलीसांनी तिघांचाही शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध भादस २७९, ३३६ आरडब्ल्यु ३४ आणि वाहतूक कायद्याच्या १२९ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.
अटक केलेल्या त्या तरुणांची नावे सुफीयान दिनगर (वय २२, रा: केपे), साहील बांदोडकर (वय २५, रा: कुडचडे) आणि लीयेंडर कुतीन्हो (वय २०, रा: मार्जोडा) अशी असल्याची माहीती पोलीसांनी दिली. त्या तरुणांनी ‘स्टंट’ करण्यासाठी वापरलेल्या तिनही दुचाकी पोलीसांनी जप्त केल्या आहेत. अटक केल्यानंतर पोलीसांनी त्यांच्याशी चौकशी केली असता ५ जानेवारी रोजी त्यांनी ते ‘स्टंट’ केल्याचे उघड झाले असून हल्लीच त्या ‘स्टंट’ चे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडायावर घातले होते अशी माहीती पोलीस सूत्रांनी दिली.
वेर्णा पोलिसांनी दुचाकीवरून धोकादायक ‘स्टंट’ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सत्र चालू ठेवले असून पाच दिवसापूर्वी त्यांनी फोंडा येथील एका २२ वर्षीय तरुणाला धोकादायक ‘स्टंट’ केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.