धुळे : नवापूर येथे जाऊन शेतीची अवजारे चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. यात एकाची चौकशी करण्यात येत असून, या प्रकरणाशी संबंधित अन्य सात जण फरार झालेले आहेत. पोलिस त्यांच्या मागावर आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साक्री तालुक्यातील जैताणे शिवारातील शेतातून शक्तिमान कंपनीचे रोटावेटर हे शेतीचे अवजार चोरट्याने चोरून नेले होते. चाेरीची ही घटना ३० मे रोजी सायंकाळी ६ ते ३१ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी १ जून रोजी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. समांतर तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारावर चोरटे नवापूरमध्ये फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.
माहिती मिळताच पथकाला नवापूरमध्ये रवाना करण्यात आले. सापळा लावून सोमियेल दाजजी वसावा उर्फ समुवेल दामू गावित उर्फ टकल्या (वय २९) आणि बिपीन वसंत मावची (वय २६, दोन्ही रा. लहान चिंचपाडा, ता. नवापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी निजामपूर परिसरातून शेती साहित्याची चोरी इतरांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलिसांनी याच प्रकरणात आणखी एकाला ताब्यात घेतले असून, चाैकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले. याप्रकरणातील अन्य सात संशयित आरोपी हे फरार झाले आहेत. अटकेतील दोघांवर पिंपळनेर, साक्री, शिंदखेडा, निजामपूर या पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.