ठाणे: वडील दुबईवरुन आल्यानंतर सर्व मालमत्ता सावत्र आईच्या नावाने करतील, या भीतीने तिची हत्या करुन पसार झालेल्या इम्रान खान (२५, रा. श्रीलंका, कौसा, मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने सोमवारी अटक केली. त्याला आता मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मुंब्रा येथील रहिवाशी शाहनाज बानू खान (५२) हिच्या पोटात ३ मे २०२२ रोजी चाकूचे वार करुन इम्रान पसार झाला होता. यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान ५ मे रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांबरोबरच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या मार्फतीनेही या खूनाचा समांतर तपास सुरु होता. या खूनानंतर इम्रान भूमीगत झाला होता. दरम्यान, तो गुजरातमधील अरवली जिल्हयात असल्याची माहिती युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे ९ मे २०२२ रोजी या पथकातील पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, योगेश काकड, उपनिरीक्षक दिपेश किणी आणि हवालदार विक्रांत पालांडे आदींच्या पथकाने त्याला गुजरातमधील मोडासा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राच्या परिसरातून ताब्यात घेतले. वडील दुबईवरून आल्यावर सावत्र आईला घेऊन ते बुलढाणा येथील गावी जाणार होते. त्याचबरोबर ते सर्व मालमत्ता तिच्या नावावर करतील या भीतीपोटी तिच्याशी भांडण करून तिच्या पोटावर वार केल्याची कबूली त्याने दिली. खूनानंतर सहा दिवसातच त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. मंगळवारी त्याला मुंब्रा पोलिसांच्या हवाली केले आहे.
गावी जाण्याची कुणकुण लागल्यानेच घातइम्रान हा त्याच्या आईसोबत नालासोपारा येथे वास्तव्याला होता. तर त्याची सावत्र आई शाहनाज बानू ही मुंब्य्रात वास्तव्याला होती. वडील या सावत्र आईला घेऊन बुलढाणा येथील गावी जाणार होते. याची कुणकुण इम्रानच्या कानावर आली होती. त्यामुळे तो हत्येच्या दोन दिवस आधीच त्याच्या मुंब्य्रातील बहिणीकडे आला होता. त्यातच तो कौसा येथील श्रीलंका परिसरात राहणाºया सावत्र आईच्या घरी गेला. तिथे भांडण उकरुन त्याने तिच्या पोटावर वार केले. त्यानेच ही हत्या केल्याची बाब समोर आल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला अटक केली. आता या गुन्हयाचा तपास मुंब्रा पोलीस करीत आहेत.